Friday, January 11, 2013

चाफा

सोनचाफ्याच्या फुलांचं मला लहानपणापासूनच खूप कुतूहल वाटत आलं  आहे. त्यांचा मंद मोहक वास, नाजुकपणा, सगळचं वेड लावणारं ...

आजीच्या परसात एक खूप उंच झाड होतं चाफ्याचं. फुलं  दिसली की छपरावर शिडीने चढून आकड्यानं ती काढायची. यात शिडीने चढणे हा सगळ्यात मोठा गमतीचा  भाग. चढताना सगळे चढायचे पटपट, उतरताना मात्र घाबरगुंडी उडायचीच कोणाचीतरी.

चाफ्याच्या झाडाला खूप खास वागणूक मिळायची. म्हणजे आजीची देवपूजा झाली की देवांच्या आंघोळीचं तबकातलं  पाणी "चाफ्याला घाल हं " असं आजी मुद्दाम सांगायची. निर्माल्यपण चाफ्यालाच. इतकचं काय तर multivitamin च्या गोळ्यासुद्धा पचवल्यात चाफ्यानं.
मग रोजचा उद्योग फुलं आली आहेत का पाहणे. कधी एखाद्या फुलाबरोबर चुकून कळी खुडली जायची तेव्हा केवढी हळहळ वाटायची. ओंजळीत फुलं घेतली की हातांना येणारा वास, अजूनही येतो आठवणींबरोबर ... त्याच चाफ्यासाठी ...एक नाजुक  चाफा आहे माझ्या परसात,
बोलतो कधीतरीच हसतो मात्र गालात

वाऱ्याबरोबर त्याची गट्टी जमते खास,
त्याच्यासंगे दरवळत मग भटकून येतो झकास

उंचीचं  आहे याला भारी वेड,
सोनेरी रंगांचे रोज उन्हा संगे खेळ

तुझी सळसळ जरी ऐकू येत नाही आज,
नाव घेताच वासमात्र येतोच हमखास
Wednesday, January 2, 2013

मनाचे कोडे


का असं मन वेडेवाकडे धावते?
माहीत असूनही की रस्ता सरळ आहे...

का असं मन भरकटत राहते ?
माहीत असूनही की सगळं अनोळखी आहे...

का धावते वेड्या स्वप्नांच्या मागं ?
माहीत असूनही की ती मृगजळासारखी आहेत..

कधी थांबवता येईल का या मनाला ?

नकोच! तेव्हा मात्र वाटेल..

का असं मन गप्प बसून राहते?
माहीत असूनही की ही तर फक्त सुरुवात आहे ...

Tuesday, May 1, 2012

एक उन्हाळी दिवस

परवा रस्त्यात पेप्सीकोला खाऊन तोंड लाल-गुलाबी झालेली चिल्ली-पिल्ली दिसली आणि मला सगळ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आठवल्या..

पेप्सीकोल्याचे वेगवेगळे प्रकार, त्याच्या जोडीला आइसक्रीम, सायकलवरून केलेल्या रपेटा, सकाळी सकाळी विहिरीत पोहणं, मातीत पडली म्हणून धुऊन खाल्लेली कुल्फी, एकदम मस्त फुगत आलेला पण शेवटी हवा जाऊन फुस्स झालेला ओव्हन मधला पहिला केक, swimming tank च्या बाहेर मिळणार मीठ घातलेलं आइसक्रीम, दुपारपर्यंत काढलेल्या साखरझोपा, संध्याकाळी भेळेचा कार्यक्रम, रात्री अंगणात सडा घालून जमलेल्या जेवायच्या पंगती,कधी आमसुलाच सार,कधी सोलकढी, चुलीत भाजलेली मातीची भांडी आणि रॉकेलच्या वासाचे बटाटे..
आठवणीच इतक्या सुंदर आहेत की बाहेरचं ऊनही कमी झाल्यासारखं वाटतंय!

Wednesday, April 13, 2011

असंच काहीतरी!

गाजियाबादच्या डासांनी सुचवलेल्या काही ओळी:


अचानक कुठूनसे स्वर ते आले कानी
इतक्या रात्री कोण असे हा प्रश्न उमटला मनी,

कधी या कानी कधी त्या कानी
कधी ती गुणगुण दोन्हीकडे,

कधी हातावर फटफट
आणि टाळ्यांचा तो नाद घुमे,

अन अचानक थांबे संगीत
सुन्न शांतता ती पसरे,

डोळे उघडून पाहताच मग
डासांची ती रास दिसे...

Monday, December 13, 2010

संध्याकाळ

परवा संध्याकाळी अचानक सांगलीतल्या घाटाची आठवण झाली. सगळीकडे भरुन उरलेला तो केशरट पिवळा रंग. समोर कृष्णेचं सावकाश, आपल्याच नादात वाहणारं पाणी. शेजारी पहुडलेला आयर्विन पूल. चिकाटीनं मासे पकडणारा एखादा मासेमार. समाधी लावलेल्या खंड्याची पाण्याकडे एखादी झरकन झेप. मधूनच शांतपणे उडत जाणारे बाणाच्या आकारातले बगळे किंवा कलकलाट करत जाणारा टारगट पोपटांचा थवा. हळू-हळू पाण्यात छोटे छोटे गोल तयार करत सांगलवाडीकडे जाणारी एखादी नाव आणि या सगळ्यावर कळस म्हणजे नदीवरुन येणारी थंडगार वार्‍याची झुळूक. बास.. असं वाटतं की या क्षणी जसं आहे तसच रहावं सगळं ..कायम.

पण हळू-हळू त्या रंगात काळी छटा गहरी होत जाते. पक्ष्यांचा आवाज बंद होऊन रातकिड्यांची नांदी सुरु होते. आयर्विन चमचमायला लागतो आणि घरची आठवण होते..

जुने फ़ोटो पाहताना किंवा पुस्तक वाचताना नाहीतर गाणं ऎकताना, दरवेळी काहीतरी नवीन सापडतं आणि एक वेगळीच मजा येते तसच काहीसं संध्याकाळचं आहे, रोज काहीतरी नवीन सापडतच, नाही का?Tuesday, May 25, 2010

तक्रार .. कशाला?


गेल्या आठवड्यात पारा रोज रोज half century ठोकत होता. सगळेच अतिशय त्रस्त होते ..
मनात कानपूरला असंख्य नावं ठेवून झाली आणि काही विचार मनात डोकावून गेले..

असं कसं सगळंच विचित्र ?
उन्हाळ्यात कूलर, हिवाळ्यात हिटर,
एरवी सदैव पंख्याची घरघर

पाऊस कधी पडतच नाही,
पडला कधी तर थांबायचं नाव नाही
पण गारवा आणणारा पाऊस कधी येणारच नाही

समुद्र नाही तरी टपटप घाम,
डोंगरावर नाही पण हुडहुडी जाम,
वार्‍याची झुळूक मात्र कधी सुद्धा नाही

त्या झोपडीतले लोकही राहतातच की असेच,
जरी लोडशेडिंग दिवसभर अन्‌ पाणी येत नसे,
सवयच लागलीय आपल्याला तक्रार करायची,
जरी कुणीही ऐकून घेत नसे ...

तक्रार नाही केली तर वाटेल का सगळं छान ?
नुसता विचार तरी करु एक महान ..

Sunday, May 9, 2010

पावसाच्या सरी....

रणरणतं ऊन संपेल का कधी?
विचार करतानाच आल्या पावसाच्या सरी

कर्कश कडकडाट झाला जरी,
मोहवून टाकती पावसाच्या सरी

सोसाट वारा अन गडगडाट भारी,
खट्याळ खेळकर अशा पावसाच्या सरी

चिखल, राडेराड पसरे परी,
मातीला सुगंध आणती या पावसाच्या सरी

ओले चिंब कपडे, चहा-कांदाभजी
कोणाला आवडणार नाहीत पावसाच्या सरी?

चकचकीत रस्ते आणि लखलखीत पाने,
मन करती स्वच्छ अशा पावसाच्या सरी

सगळ्या चिंता अन काळज्या भारी,
क्षणात भुलवती अशा पावसाच्या सरी