Monday, December 13, 2010

संध्याकाळ

परवा संध्याकाळी अचानक सांगलीतल्या घाटाची आठवण झाली. सगळीकडे भरुन उरलेला तो केशरट पिवळा रंग. समोर कृष्णेचं सावकाश, आपल्याच नादात वाहणारं पाणी. शेजारी पहुडलेला आयर्विन पूल. चिकाटीनं मासे पकडणारा एखादा मासेमार. समाधी लावलेल्या खंड्याची पाण्याकडे एखादी झरकन झेप. मधूनच शांतपणे उडत जाणारे बाणाच्या आकारातले बगळे किंवा कलकलाट करत जाणारा टारगट पोपटांचा थवा. हळू-हळू पाण्यात छोटे छोटे गोल तयार करत सांगलवाडीकडे जाणारी एखादी नाव आणि या सगळ्यावर कळस म्हणजे नदीवरुन येणारी थंडगार वार्‍याची झुळूक. बास.. असं वाटतं की या क्षणी जसं आहे तसच रहावं सगळं ..कायम.

पण हळू-हळू त्या रंगात काळी छटा गहरी होत जाते. पक्ष्यांचा आवाज बंद होऊन रातकिड्यांची नांदी सुरु होते. आयर्विन चमचमायला लागतो आणि घरची आठवण होते..

जुने फ़ोटो पाहताना किंवा पुस्तक वाचताना नाहीतर गाणं ऎकताना, दरवेळी काहीतरी नवीन सापडतं आणि एक वेगळीच मजा येते तसच काहीसं संध्याकाळचं आहे, रोज काहीतरी नवीन सापडतच, नाही का?



6 comments: