Monday, December 13, 2010

संध्याकाळ

परवा संध्याकाळी अचानक सांगलीतल्या घाटाची आठवण झाली. सगळीकडे भरुन उरलेला तो केशरट पिवळा रंग. समोर कृष्णेचं सावकाश, आपल्याच नादात वाहणारं पाणी. शेजारी पहुडलेला आयर्विन पूल. चिकाटीनं मासे पकडणारा एखादा मासेमार. समाधी लावलेल्या खंड्याची पाण्याकडे एखादी झरकन झेप. मधूनच शांतपणे उडत जाणारे बाणाच्या आकारातले बगळे किंवा कलकलाट करत जाणारा टारगट पोपटांचा थवा. हळू-हळू पाण्यात छोटे छोटे गोल तयार करत सांगलवाडीकडे जाणारी एखादी नाव आणि या सगळ्यावर कळस म्हणजे नदीवरुन येणारी थंडगार वार्‍याची झुळूक. बास.. असं वाटतं की या क्षणी जसं आहे तसच रहावं सगळं ..कायम.

पण हळू-हळू त्या रंगात काळी छटा गहरी होत जाते. पक्ष्यांचा आवाज बंद होऊन रातकिड्यांची नांदी सुरु होते. आयर्विन चमचमायला लागतो आणि घरची आठवण होते..

जुने फ़ोटो पाहताना किंवा पुस्तक वाचताना नाहीतर गाणं ऎकताना, दरवेळी काहीतरी नवीन सापडतं आणि एक वेगळीच मजा येते तसच काहीसं संध्याकाळचं आहे, रोज काहीतरी नवीन सापडतच, नाही का?



Tuesday, May 25, 2010

तक्रार .. कशाला?


गेल्या आठवड्यात पारा रोज रोज half century ठोकत होता. सगळेच अतिशय त्रस्त होते ..
मनात कानपूरला असंख्य नावं ठेवून झाली आणि काही विचार मनात डोकावून गेले..

असं कसं सगळंच विचित्र ?
उन्हाळ्यात कूलर, हिवाळ्यात हिटर,
एरवी सदैव पंख्याची घरघर

पाऊस कधी पडतच नाही,
पडला कधी तर थांबायचं नाव नाही
पण गारवा आणणारा पाऊस कधी येणारच नाही

समुद्र नाही तरी टपटप घाम,
डोंगरावर नाही पण हुडहुडी जाम,
वार्‍याची झुळूक मात्र कधी सुद्धा नाही

त्या झोपडीतले लोकही राहतातच की असेच,
जरी लोडशेडिंग दिवसभर अन्‌ पाणी येत नसे,
सवयच लागलीय आपल्याला तक्रार करायची,
जरी कुणीही ऐकून घेत नसे ...

तक्रार नाही केली तर वाटेल का सगळं छान ?
नुसता विचार तरी करु एक महान ..

Sunday, May 9, 2010

पावसाच्या सरी....

रणरणतं ऊन संपेल का कधी?
विचार करतानाच आल्या पावसाच्या सरी

कर्कश कडकडाट झाला जरी,
मोहवून टाकती पावसाच्या सरी

सोसाट वारा अन गडगडाट भारी,
खट्याळ खेळकर अशा पावसाच्या सरी

चिखल, राडेराड पसरे परी,
मातीला सुगंध आणती या पावसाच्या सरी

ओले चिंब कपडे, चहा-कांदाभजी
कोणाला आवडणार नाहीत पावसाच्या सरी?

चकचकीत रस्ते आणि लखलखीत पाने,
मन करती स्वच्छ अशा पावसाच्या सरी

सगळ्या चिंता अन काळज्या भारी,
क्षणात भुलवती अशा पावसाच्या सरी

Sunday, April 11, 2010

अवचित!

अवचित!

अवचित घडणाऱ्या गोष्टी किती छान असतात ना ! बऱ्याच दिवसांनी एखाद्या जुन्या मैत्रिणीचा फोन यावा आणि खूप गप्पा माराव्यात. कोकणात नारळीच्या बागेतून जाताना एकदम समुद्र समोर यावा. एकदम घाणेरड्या रस्त्यावरून तंगडतोड करीत जात असताना निशिगंधाचा सुगंध यावा. ठासून भरलेल्या रेल्वेतून अतिशय वैतागवाणा प्रवास करून स्टेशनवर उतरावं आणि मस्त वारं सुटलेलं असावं किंवा पावसात चिंब भिजत येत असताना रस्त्यात एखादी चहाची टपरी दिसावी आणि गरमागरम कांदाभजी खायला मिळावी. नाहीतर आपणच कधीतरी आणि कधी नव्हे ते 'फार' व्यवस्थित ठेवलेले पैसे काहीतरी तिसरंच हुडकताना आपल्याला मिळावेत...

हे सगळं एकदम आठवायचं कारण लिहीलच नाही... परवा lab मधून येताना इतकी सुंदर चंद्रकोर दिसली, अगदी अवचितच!